Dr. Nalini Bagul

Blog

गरोदरपणा व कोरोना

(आपण किंवा आपली नातेवाईक गरोदर आहे का ? मग कोरोना बद्दल ही माहिती हवीच.)

१. गरोदरपणामध्ये कोरोना संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे का ?

गरोदरपणामध्ये संसर्गाचा धोका इतरांसारखाच असतो.परंतु कोरोना झाल्यानंतर उपचारामध्ये गरोदर असल्याने बऱ्याच अडचणी येऊ शकतात. तसेच आई व पोटातील बाळ यांच्यासाठी उपचार करणे सामान्या पेक्षा वेगळे असते.त्यामुळे कोरोना होऊच नये याची जास्त खबरदारी घ्यावी.

२. गरोदर महिलेस कोरोना झाल्यास नवजात बाळाला होतो का ?

आत्तापर्यंत संशोधनामध्ये मातेकडून गर्भातील बाळाला कोरोना संसर्ग होत नसल्याचे आढळून आले आहे.

३. कोरोना होऊ नये यासाठी गरोदर मातेने काय काळजी घ्यावी ?

जसे इतर लोकांना काळजी घ्यावी लागते की घराबाहेर न पडणे, मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे यासहित. गरोदर स्त्रियांनी रूटीन तपासणीसाठी दवाखान्यात न जाता शक्य तेव्हा ऑनलाईन, फोन किंवा व्हिडिओ कॉन्फरन्स पद्धतीने संपर्क करावा. आवश्यक गरज असेल तरच दवाखान्यात जावे. तसेच दवाखान्यात जाताना जास्त नातेवाईक सोबत घेवून जावू नये.
लक्षणे जसे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी असल्यास नियमित बाह्य रुग्ण विभागात न जाता तात्काळ फिवर ओपीडी मध्ये जावे.नेहमी मास्क योग्य पद्धतीने वापरावा.

४. घरातील मंडळीनी काय काळजी घ्यावी ?

बऱ्याच वेळी असे निदर्शनास आले आहे की घरातील वृध्द व्यक्ती, गरोदर स्त्रिया, बालके यांना घराबाहेर पडणाऱ्या नातेवाईकांकडून संसर्ग होतो. तरी नातेवाईकांनी अशा लोकांच्या संपर्कात यायचे टाळावे.

५. नियमित गरोदरपणाची तपासणी महिन्याला करावी का ?

गरोदर महिलांनी सध्या कमीत कमी पण आवश्यक वेळी स्त्री रोग तज्ञांची भेट घेतली पाहिजे. इतर वेळी व्हिडिओ कॉन्फरन्स किंवा ऑनलाईन पद्धतीने डॉक्टरांशी संपर्क करावा. तरी त्यांनी १२, २०, २८ , ३६ आठवडे अशा भेटी दिल्या पाहिजेत. तसेच घरच्या घरी वजन, रक्तदाब, डेली फिटल काउन्ट करावे.

६. डेली फिटल काउन्ट म्हणजे काय ?

जर गर्भातील बाळाची २४ तासात कमीत कमी १० वेळा हालचाल झाल्यास बाळाचे आरोग्य व्यवस्थित आहे असे समजले जाते.गरोदर महिलांनी जेव्हा त्या निवांत बसल्या किंवा झोपल्या असताना गर्भातील बाळाची हालचाल मोजण्यास सुरुवात करावी.१० हालचाली झाल्यास मोजणे बंद करावे.

७. कोरोनामुळे गर्भपात करावा लागतो का ?

नाही. कोरोना संसर्गामुळे गर्भपात होत नाही. तसेच रुग्णाला गर्भपात करून घेण्याचीही गरज लागत नाही.

८. कोरोना संसर्ग झाला तर जन्मनारे बाळ व्यंग ( Anamolus ) जन्मते का ?

नाही. आत्तापर्यंतच्या संशोधनामध्ये असे काही आढळले नाही.

९. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रसूती व उपचार प्रत्येक दवाखान्यात किंवा प्रसूती गृहात होतो का ?

नाही. त्यासाठी सध्या मातांना कोविड केअर रुग्णालय जसे की शासकीय तसेच खाजगी मध्ये उपलब्ध आहेत. अशा ठिकाणी प्रसूतीसाठी जावे लागेल.प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय व खाजगी रुग्णालय उपलब्ध आहेत.

१०. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांची प्रसूती संसर्ग न झालेल्या रुग्णासोबत करता येते का ?

नाही. त्यासाठी वेगळे प्रसूती कक्ष तसेच वेगळे शस्त्र क्रीयागृह उपलब्ध केले जाते.

११. प्रसूती दरम्यान कोरोना रुग्णासोबत नातेवाईकांना उपस्थित राहता येते का ?

कोरोना संसर्ग जवळच्या व्यक्तीस होऊ शकतो तसेच डॉक्टर, स्टाफ यांना सुद्धा कोरोना संसर्ग होण्याचा धोका असतो. PPE kit घालून आरोग्य कर्मचारी उपचार करतात. त्यामुळे नातेवाईकांना संसर्ग होऊ नये म्हणून उपस्थित राहता येत नाही.

१२.सिझेरियनचे प्रमाण कोरोना संसर्गामुळे वाढते का ?

नाही. कोरोना हे सिझर करण्याचे कारण नाही. जर सिझरचे इतर कारण असल्यास सिझर केले जाते.

१३. कोरोनामुळे सिझरची जखम भरण्यास वेळ लागतो का ?

नाही.

१४. कोरोना संसर्ग झालेल्या स्त्रीच्या सिझरसाठी कोणती भुल वापरली जाते ?

स्पायनल किंवा इपिड्युरल ( Epidural ) भूल ही प्रामुख्याने वापरली जाते. संपूर्ण भूल (General anasthesia) शक्यतो टाळली जाते.

१५. कोरोना संसर्ग झालेल्या माता बाळास स्तनपान करू शकतात का?

हो, जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की मातेच्या दुधामध्ये कोरोनाचे विषाणू आढळलेले नाहीत. त्यामुळे स्तनपान करू शकतात. पण यासाठी मातेने काळजी घेणे आवश्यक आहे . जसे की मास्क वापरणे , पाजवल्यानंतर बाळाला स्वतः पासून दूर ठेवणे किंवा मातेच्या स्तनातील दूध काढून चमच्याने दूध पाजवावे, ह्यूमन मिल्क बँक असेल तर ते दूध वापरावे.

१६. सर्व गरोदर मातांची कोरोना चाचणी आवश्यक आहे का ?

नाही . ज्यांना लक्षणे आहेत किंवा कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास तपासणी करावी लागते.लक्षणे नसताना पण ज्यांची प्रसूतीची तारीख पाच दिवसावर आहे त्यांची पन तपासणी करावी लागते.

१७. कोणत्या महिलांना संसर्ग झाल्यास जास्त धोका असतो ?

गरोदर महिला, ज्यांना उच्च रक्तदाब , मधुमेह, दमा, HIV, हृदयाचा आजार, आजार असेल त्यांना धोका जास्त आहे.

१८.आपण शेवटी काय सल्ला द्याल ?

पाच गोष्टी प्रामुख्याने-
१. घरी रहा.
२. हात नेहमी स्वच्छ धुणे.
३. चेहऱ्याला स्पर्श टाळा.
४. सामाजिक अंतर ठेवा.
५. खोकताना चेहरा झाकून घ्या.

संतुलित आहार,भरपूर पाणी प्यावे,दोन वेळेस कोमट पाण्याने अंघोळ करावी, तसेच व्हिटॅमिन सी युक्त फळे व भाज्यांचा आहारात समाविष्ट करावा.

*डॉ.नलिनी बागुल

Get an Appointment for Consultation